हर हर महादेवच्या गजराने परिसर दुमदमला
पैठण, (प्रतिनिधी) दक्षिण काशीतील पैठण येथील सिद्धेश्वरी तीर्थावलीवर १५ फेब्रुवारी रविवारी रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेल्या शिवरात्री महोत्सवाला यंदा ७३८ वर्ष पूर्ण झाली आहे. शिवरात्रीच्या महापर्वावर मराठवाड्याच्या काण्याकोपऱ्यातून तसंच इतर राज्यातून रूढी, परंपरा व प्रथेनुसार ब्रह्मदेवाने स्थापित केलेल्या शिवलिंग पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने लोटला होता.
संत ज्ञानेश्वराने शुद्धिपत्र मिळाल्यानंतर सिद्धेश्वर तीर्थावळीवर १२८७ ला दोन वर्ष आठ महिने मुक्काम ठेवला होता. तेव्हापासून सिद्धेश्वर तीर्थवली वर महाशिवरात्री पर्वावर यात्रा भरू लागली. सिद्धेश्वर महादेव भक्त व भाविकांच्या पुढाकाराने सिद्धेश्वर तीर्थावळीचा विकास होत आहे.
पैठण ही भूमी अतिशय प्राचीन असून या शहरात अनेक प्राचीन महादेवाची मंदिरे आहेत. गाढेश्वर, दोलेश्वर, गंगेश्वर, सोमेश्वर, गोदेश्वर, पिंपळेश्वर हरहरेश्वर, कलिकेश्वर, रामेश्वर, तारकेश्वर, इंद्रेश्वर नागेश्वर व बाळलिंगेश्वर आदि महादेवांच्या दर्शनासाठी शिवरात्री पर्वावर भाविकांनी गर्दी केली होती. जैनपुरा पैठण येथे व गोदाकाठच्या रामतीर्थावर व पिंपळेश्वर तीर्थावलीवर ही सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
गोदावरीवरील ३२ तीर्थावळीं चे एकच मंदिर उभे करण्यासाठी श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी भक्तांनी केली आहे. सिद्धेश्वराच्या महादेवाची पिंड गोदावरीच्या पात्रात आहे पायऱ्या उतरून भाविकांना दर्शन घ्यावे लागते महादेवाचे दर्शन घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी आपल्या परिवारासह हजेरी लावली होती. उत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.












